
लातूर दिनांक 26/01/2026. कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील पाणबुडी मोटर व म्हशी चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश. चार आरोपी जेरबंद, ९.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्ह्यात शेतशिवारातील पाणबुडी मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी तसेच परवाना असलेल्या हॉटेल व बिअर बार फोडून विदेशी दारू चोरी करणाऱ्या संघटित टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत नियोजनबद्ध व धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत चार सराईत आरोपींना अटक करून तब्बल ९,२६,२४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २४/०१/२०२६ रोजी मा. पोलीस अधीक्षक अमोल तांबे व मा.अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वात विशेष पोलीस पथकाची निर्मिती करण्यात आली. सदर पथक मुरुड–अकोला परिसरात लातूर जिल्ह्यात घडलेल्या शेतातील साधनसामग्री चोरीतील संशयित गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लातूर ते मुरुड जाणाऱ्या रस्त्यावर करकटा पाटी येथील एका बार समोर पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहना सह चार संशयित इसम संशयास्पदरीत्या थांबले आहेत . या माहितीच्या आधारे तात्काळ नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला. दुपारी १४.३० वाजता संशयित वाहनासह खालील चारही इसमांना ताब्यात घेण्यात आले.
१) महादेव उर्फ बापु सुरेश चव्हाण, वय ४५ वर्षे रा. राजेशनगर, ढोकी, ता. वाशी, जि. धाराशिव
२) राहुल निवत्ती काळे, वय २३ वर्षे
रा. साठे चौक, धाराशिव, जि. धाराशिव
३) तेजस उर्फ पप्पु भिमराव शिंदे, वय ३५ वर्षे रा. पिंपळगाव, ता. वाशी, जि. धाराशिव
४) नितीन गजेंद्र काळे, वय ३२ वर्षे
रा. राजेशनगर, ढोकी, ता. वाशी, जि. धाराशिव
असे असून त्यांची अंगझडती व वाहन तपासणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम : ₹1,57,000/-, ५ एचपी क्षमतेच्या १० पाणबुडी मोटारी, विदेशी दारूचे २३ बॉक्स,गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप वाहन (एम.एच. ४४ यू १३१६) असा मुद्देमाल मिळून आला. नमूद आरोपींची सखोल चौकशी केली असता आरोपींनी कबुली दिली की, ते आपल्या इतर तीन फरार साथीदारांसह गेल्या एक वर्षापासून लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत शेतशिवारातील पाणबुडी मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी चोरी करीत होते. तसेच काही दिवसांपूर्वी वैराग जिल्हा सोलापूर परिसरातील एक बिअर बार अँड परमिट रूम फोडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू चोरी केली होती. विविध चोरीचा माल विकून मिळालेली रक्कमच त्यांच्या ताब्यात आढळून आलेली रोख रक्कम असल्याचे सांगितले.
आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्ह्यातील पुढील पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांशी त्यांचा थेट संबंध असल्याची खात्री झाली –
पो.स्टे. मुरुड, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, कासार शिरसी, वैराग (जि. सोलापूर) इत्यादी ठिकाणी दाखल असलेले एकूण १० गंभीर गुन्हे उघड झाले असून या कारवाईत एकूण १० पाणबुडी मोटारी ₹71,800/-, विदेशी दारू : ₹1,97,440/-,रोख रक्कम : ₹1,57,000/-,बोलेरो पिकअप वाहन : ₹5,00,000/-एकूण किंमत : ₹9,26,240/- (नऊ लाख सव्वीस हजार दोनशे चाळीस रुपये)
सदर सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चारही आरोपींना पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन मुरुड गुन्हा क्र. ३९३/२०२५, कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये हजर करण्यात आले आहे. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई लातूर जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे, तांत्रिक कौशल्याचे आणि गुन्हेगारांविरोधातील कठोर भूमिकेचे उत्तम उदाहरण आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाने मिळवलेल्या मालमत्तेवर होणाऱ्या चोरीला आळा घालणे, व्यापाऱ्यांचे संरक्षण करणे आणि समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा पोलीस प्रशासनाचा दृढ संकल्प आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, अमर केंद्रे , राजेश घाडगे, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे,तुराब पठाण, रामलिंग शिंदे,राजेश कंचे,मोहन सुरवसे,तुळशीराम बरुरे, पाराजी पुट्टेवाड, गणेश साठे,गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे,प्रदीप चोपणे, श्रीनिवास जांभळे,शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांनी केली आहे.



