राज्य माहिती आयोगाचा दणका! माहिती लपवली १० हजार दंड !
पोलीस क्राईम न्यूज नागपूर जिल्हा प्रतिनिधी
तांबापुर दिनांक २२/०३/२०२६ येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान क्र. ३८/३ मधील कथित गैरकारभाराबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवण्यात आली होती. मात्र तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील जनमाहिती अधिकारी तथा पुरवठा अव्वल कारकून यांनी संबंधित माहिती देण्यास टाळाटाळ करत विहित कालावधीत माहिती न पुरवल्याचा गंभीर प्रकार समोर आला.
या प्रकरणाची दखल घेत राज्य माहिती आयोग भूपेंद्र गुरव नाशिक खंडपीठाने कडक भूमिका घेत तहसील कार्यालय जळगाव येथील श्री. ए. आर. जाधव आणि श्री. अनिल पवार यांच्यावर माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २० (१) अंतर्गत रु.१०,००० असा दंड ठोठावला. तसेच हा दंड त्यांच्या पगारातून कपात करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. तांबापुर येथील स्वस्त धान्य दुकानातील गैरकारभाराबाबत
पारदर्शकता ठेवण्याऐवजी माहिती देण्यास विलंब आणि टाळाटाळ केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष तसेच माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते हुसेन हसन खान यांनी दिली. या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांमध्ये माहिती अधिकार अर्जाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक इशारा मिळाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

