देऊळवाडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात उपोषणाचा आज तीसरा दिवस; रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केंद्रे प्रकाश उपोषणस्थळी ठाम

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क ७०२८६२३ १००
उदगीर दिनांक 27/12/2025, देऊळवाडी (ता. उदगीर, जि. लातूर) : देऊळवाडी गावातील पांदन रस्ते, गावांतर्गत रस्ते तसेच देऊळवाडी–गुंडोपंत दापका रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात सुरू असलेले अन्नत्याग उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केंद्रे प्रकाश करत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
केंद्रे प्रकाश यांनी यापूर्वी संबंधित विभाग, अधिकारी व प्रशासनाकडे वारंवार लेखी अर्ज व तक्रारी सादर केल्या होत्या. तसेच उच्चस्तरीय कार्यालयाकडेही निवेदन दिले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष स्थळ पाहणी, चौकशी किंवा ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक तसेच आपत्कालीन सेवांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतमाल वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. उपोषणस्थळी रयत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. प्रशासनाने तातडीने सर्व तक्रारींची चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीचे आदेश द्यावेत आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी त्वरित प्रशासकीय व आर्थिक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केंद्रे प्रकाश यांनी केली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्यक्ष दखल घेऊन ठोस निर्णय घेतल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



