आर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्र

ॲग्रीस्टॅक’ योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘फार्मर आयडी’

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 7028623100

लातूर, दि. १४/१२ : राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णय निर्णयानुसार लातूर जिल्ह्यात सोमवार, १६ डिसेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक गावात कॅम्प आयोजित केले जाणार असून या कॅम्पमध्ये गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक्र तयार करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रीस्टॅक’मध्ये शेतकऱ्यांसाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच असा माहिती संचांचा यामध्ये समावेश आहे.

असे आहेत ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेचे अपेक्षित फायदे

१. पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्यामध्ये सुलभता येईल.

२. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल.

३. शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल.

४. पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल.

५. किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.

शासनाने ही योजना बीड जिल्ह्यामध्ये गतवर्षी प्रायोगिक तत्वावर राबविली होती. त्यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना अवघ्या ४५ मिनिटात ऑनलाईन पीक कर्ज उपलब्ध करुन देणे शक्य होत आहे.

अशी होणार योजनेची अमंलबजावणी ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी १६ डिसेंबर २०२४ पासून गावनिहाय तीन दिवस कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. या कॅम्पसाठी ग्राम महसूल अधिकारी व कृषि सहाय्यक तथा ग्राम विकास अधिकारी यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावनिहाय आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पच्या वेळापत्रकाबाबत पथकातील कर्मचारी हे गावात प्रसिद्धी देणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येणार आहे. तरी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपल्या गावात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये गावातील शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक व मोबाईल सोबत घेऊन उपस्थित रहावे. आपला शेतकरी ओळख क्रमांक्र तयार करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button